काळी दौलत येथे पोळा सण उत्साहात साजरा; सर्व समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग*


MKM MARATHI NEWS

*काळी दौलत येथे पोळा सण उत्साहात साजरा; सर्व समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग*

काळी दौलत/महागांव दि 10 सप्टेंबर

 

शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला पोळा सण काळी दौलत येथे मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षी या उत्सवात विशेष म्हणजे गावातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत आखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मैदानात सहभाग नोंदवला.

 

सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीला सजवण्यास सुरुवात केली होती. बैलांना रंगरंगोटी करून, शिंगांना बेगड लावून, गळ्यात घुंगरांच्या माळा घालून सजवण्यात आले होते. दुपारी गावातील महादेव मंदिरापासून मारोती मंदिराला वेढा मारून बैलजोडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 

गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते बैलांची पूजा करण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुक्या प्राण्यांचा सन्मान करणे हा या सणामागचा उद्देश आहे.

 

या मिरवणुकीत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता. ढोल-ताशांच्या व डफड्याच्या गजरात संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पोळा सणानिमित्त महिलांनी घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता.

 

एकात्मतेचे दर्शन घडवणारा हा सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक या वेळी उपस्थित होते.

 

> “पोळा हा फक्त सण नाही तर शेतकरी आणि बैल यांच्यातील ऋणानुबंध आहे. सर्व समाजाला एकत्र आणणारा हा सण काळी दौलत मध्ये दरवर्षी अशाच एकोप्याने साजरा होतो,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

संध्याकाळी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन या उत्सवाची सांगता करण्यात आली.


7
कृपया वोट करा

MKM मराठी न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!