*ढाणकीत पोळा सण मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा*
ढाणकी प्रतिनिधी :* शेतकरी राजाचा सर्वात जिव्हाळ्याचा आणि पारंपरिक सण असलेला पोळा यावर्षीही ढाणकी येथे मोठ्या आनंदात, उत्साहात आणि कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोळा सण साजरा करण्याचे आवाहन बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी सर्व गावकरी व शेतकरी बांधवांना केले होते. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोड्या सजवून कार्यक्रमस्थळी हजेरी लावली.
दि. १० रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता हनुमान मंदिर परिसर, महादेव मंदिर परिसर, ढाणकी येथे बैलांची सामूहिक पूजा करण्यात आली. यावेळी परंपरेनुसार हरण्या बैलाची पूजा करण्यात आली असून, पूजाविधी दरम्यान बैलाचे तोंड पूर्व दिशेला* ठेवण्यात आले होते. विधीवत पूजा झाल्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवण्यात आला.
पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाचे विशेष कोडकौतुक केले. बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग, अंगावर रंगीबेरंगी झूल, गळ्यात घुंगरमाळा, पायाला घुंगरू पैंजण,आणि फुलांच्या माळा घालून त्यांना सजवण्यात आले होते. सजवलेल्या बैलजोड्यांची गावातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी “शंभूच्या नावानं हर हर बोला”अशा जयघोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मिरवणूक पाहण्यासाठी अबालवृद्धांसह महिलांची मोठी गर्दी जमली होती.
गेल्या एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंताग्रस्त आहे. पोळ्याच्या दिवशी तरी पाऊस हजेरी लावेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. तरीही दुष्काळाच्या सावटाची चिंता बाजूला सारून शेतकरी राजाने आजच्या दिवसाचा मनसोक्त आनंद लुटला. वर्षभर शेतात आपल्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या मुक्या जीवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पुढील हंगाम सुखाचा व भरभराटीचा जावो, अशी प्रार्थना सर्वांनी महादेवाकडे केली.
एकंदरीत ढाणकीतील पोळा सण ऐक्य, श्रद्धा आणि परंपरेचे दर्शन घडवणारा ठरला.




