- रेती तस्करांना महसूलचा दणका! दोन ट्रॅक्टर जप्त
हिवरा, जनुना येथे धडक कारवाई; प्रत्येकी एक ब्रास रेती जप्त, दंडात्मक कारवाई प्रस्तावित
संपादकः- मायाताई सागर पाईकराव.
महागाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने आता धडक कारवाईचे हत्यार उपसले आहे. हिवरा आणि जनुना येथे करण्यात आलेल्या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून प्रत्येकी एक ब्रास रेती जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी ओमकार एकाळे आणि तहसीलदार अभय मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गोविंद ठाकरे, बाळासाहेब माने, महसूल सहाय्यक दीपक चव्हाण व अक्षय बोनगुलवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मंगळवारी रात्री हिवरा येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पथकाच्या निदर्शनास आले. तत्काळ कारवाई करीत हे वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी जनुना येथेही रेतीची अवैध वाहतूक करणारे दुसरे ट्रॅक्टर पकडण्यात आले. दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी एक ब्रास रेती असल्याचे मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. हिवरा येथे पकडण्यात आलेले ट्रॅक्टर समाधान धोत्रे, तर जनुना येथे पकडण्यात आलेले ट्रॅक्टर रोहित नरवाडे यांच्या मालकीचे असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
दंडाच्या कारवाईकडे लक्ष अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन्ही वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसंदर्भातील नियमांनुसार दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांकडून किती दंड वसूल होणार, याकडे लक्ष लागले आहे.
तस्करीविरोधात मोहीम तीव्र होणार
महसूल विभागाने अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, यापुढेही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तपासणी व कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी ओमकार एकाळे यांनी दिली. सलग दोन कारवायांमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .






