- महागाव नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांना लागली ‘टक्केवारीची किड’ – शैलेश कोपरकर.
महागाव नगरपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती होण्यास वेळ लागणार नाही …
*मु.संपादक:- सागर पाईकराव.*
महागाव नगरपंचायतीतील सत्ताधारी पदाधिकारी व नगराध्यक्षाच्या पतीच्या हस्तक्षेपाच्या कारभारामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली असून नगरपंचायतीचा कारभार हा जनहितापेक्षा टक्केवारीच्या राजकारणाभोवती फिरत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेवक शैलेश कोपरकर यांनी केला आहे .
शहरातील विविध प्रलंबित प्रश्न रखडलेली विकासकामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .
महागाव नगरपंचायतीमध्ये विकासकामांपेक्षा टक्केवारीला अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत असल्याचे शैलेश कोपरकर यांनी सांगितले आहे .
अनेक रस्ते , नाल्या , पिण्याच्या पाण्याच्या योजना , स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित कामे मंजूर होऊनही प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला . काही ठिकाणी कामे मंजूर असूनही ती जाणीवपूर्वक रोखली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे .
कोपरकर यांनी पुढे आरोप केला की , महागाव नगरपंचायतीचा कारभार हा नगरपंचायत प्रशासनापेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे .
नगराध्यक्षांच्या पती कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती दीपक आडे हे होते नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात त्यांचा फार मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला . लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत , मात्र प्रत्यक्षात काही व्यक्ती नगरपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेत अनावश्यक हस्तक्षेप करत असल्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे .
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक व प्रशासकीय परिस्थिती आधीच अत्यंत बिकट झाली असून ती ‘व्हेंटिलेटर’वर असल्याची चर्चा आहे . आणि त्यास कारणीभूत महागाव नगरपंचायत च्या नगराध्यक्षाचे पती दीपक आणि हेच असल्याचे शैलेश कोपरकर यांनी यावेळी सांगितले आहे . अशा परिस्थितीत त्या कारभाराची पुनरावृत्ती नगरपंचायतीत होऊ नये , अशी अपेक्षा नागरिकांची आहे .
मात्र सध्याची परिस्थिती पाहता नगरपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने चिंताजनक वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप शैलेश कोपरकर यांनी केला .
तसेच नगरपंचायत कार्यालयामध्ये विविध दाखले , प्रमाणपत्रे आणि प्रशासकीय कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला . सामान्य नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याऐवजी त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचे त्यांनी म्हटले .
या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे .
महागाव शहरातील अनेक विकासकामे टक्केवारीच्या वादामुळे किंवा स्वार्थी राजकारणामुळे रखडली असून याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे . शहराच्या विकासासाठी आलेला निधी पारदर्शकपणे खर्च झाला पाहिजे . नागरिकांच्या कराच्या पैशांचा योग्य वापर व्हावा आणि सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करत शैलेश कोपरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आपण करत असलेल्या आरोपांबाबत वेळप्रसंगी आवश्यक ते पुरावे संबंधित यंत्रणांसमोर सादर करण्यास तयार असल्याचेही शैलेश कोपरकर यांनी स्पष्ट केले.
नगरपंचायतीतील कथित गैरप्रकार, हस्तक्षेप आणि टक्केवारीच्या राजकारणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे , अशी मागणी त्यांनी केली आहे .
या गंभीर आरोपांमुळे महागावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .








